यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराने शहरात आता प्रचंड वेग घेतला असून, सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारफेऱ्यांचा धडाका सुरू झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. छायाताई पाटील यांच्या प्रचाराला संपूर्ण शहरातून नागरिकांचा सहभाग असून त्यांच्या प्रचारार्थ रॅलीत मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात ताकद लावली असून, माजी नगराध्यक्ष अतूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावल शहराच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहे. या प्रचारात, छायाताई पाटील यांनी यापूर्वी केलेल्या तसेच आगामी काळात प्रस्तावित असलेल्या विकास कामांवर भर दिला जात आहे. त्यांच्या सभा आणि भेटींदरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे.

हर्षाताई चौधरी यांनी व्यक्त केला विश्वास
या प्रचारफेरीत सहभागी झालेल्या हर्षाताई चौधरी यांनी विजयाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “निवडणूक केवळ आश्वासनांवर नाही, तर नागरिकांसाठी केलेल्या ठोस विकास कामांवर जिंकता येते.” जनतेचा प्रतिसाद पाहता, छायाताई पाटील आणि त्यांच्यासोबत निवडणुकीत उतरलेल्या सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावरच नागरिक महाविकास आघाडीला एकहाती सत्ता देतील, असा विश्वास हर्षाताई चौधरी यांनी व्यक्त केला.
विकास कामांवर लक्ष केंद्रित
या प्रचारात, शहराच्या मूलभूत समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि रस्ते विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. छायाताई पाटील यांनी आपल्या भाषणातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली भूमिका नेहमीच खंबीर राहिली असून, पुढील काळातही शहराला एक मॉडेल शहर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आहे.
यावलमधील नागरिकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिलेला हा प्रतिसाद पाहता, या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारणार आणि नगराध्यक्षपदी छायाताई पाटील विराजमान होणार, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे.



