ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा चौथा भाग.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख तथा गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांच्या मार्गदर्शनात माझे पीएच. डी. संशोधनाचे कार्य सुरु झाले. मी या कार्यासाठी उत्साहात आणि आनंदात होतो. पीएच. डी. संशोधनासाठी माझा विषय, ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ निश्चित झालेला होता. संशोधनाच्या टप्पेनिहाय प्रक्रियेनुसार प्रकरण निहाय विषय निश्चित करून त्याचा अभ्यास करणे, त्या विषयावर अगोदर झालेल्या संशोधन कार्यांचे संदर्भ मिळविणे, त्याच्याशी संबंधित इतर उपविषयांची माहिती घेणे, त्यांचे क्रमाने संकलन करणे, वर्गिकरण करणे, मान्यवरांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेणे, आपल्याला जे म्हणायचे आहे त्याला अनुसरून लेखन करणे असे कार्य करण्यास प्रारंभ झाला.


संशोधन कार्याच्या पहिल्या टप्प्यात लक्षात आले की, हे कार्य एकांतात अभ्यासाचे, प्रचंड वाचनाचे, अनेक तास निव्वळ चिंतनाचे, संयम ठेऊन लेखनाचे काम करण्याचे आहे. तसेच ते शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे कार्य आहे. प्रारंभी काही विषयांचा अभ्यास – संकलन करताना उथळपणा आणि घाई होत असे. काही संदर्भ लक्षात येत नसत. काही सुटून जात असत. लेखनात अर्धवटपणा राहत असे. त्याची तपासणी गाईड करीत. त्यांच्याकडून भरपूर सूचना, शंका घेतल्या जात. जे आहे, जे गृहित धरले आहे, जे सुटून गेले आहे ते दाखवा, लिहा असे गाईड म्हणत. मग नव्याने सर्व काम पुन्हा करावे लागत असे.
अर्थात, हा अनुभव पहिल्या प्रकरणाच्या अभ्यासात आणि लेखनात आला. मला बातमी, लेख, मुलाखती वैगरे लेखनाचा अनुभव होता. पण संशोधनाचे लेखन करण्याची पद्धती पूर्णतः वेगळी आणि प्रत्येक शब्द, संकल्पना स्पष्ट करीत म्हणणे मांडत जाण्याची लेखन क्रिया असते हे सरावाने लक्षात आले. मला माहिती आहे, इतरांना माहिती आहे, हे गृहित धरून संशोधन कार्यात काहीही लिहिता येत नाही. अगदी व्यावहारिक भाषेतील म्हणीचा आधार घेत संगायचे तर संशोधन कार्याच्या लेखनात प्रत्येक ओळीत ‘बाप सुद्धा दाखवावा लागतो आणि त्याचे श्राद्धही घालत जावे लागते.’

माझ्यासाठी एक बाब सुदैवी ठरली. मी संगणकावर मजकूर ऑपरेटिंग, मजकुराची मांडणी, गरजेनुसार फोटोग्राफी व संगणक प्रणालीवर आधारित जेपीजी, पीडीएफ, चार्ट, आलेख करणे अशी सर्व कौशल्ये आत्मसात केलेली आहेत. एक चांगला ऑपरेटर असल्यामुळे मी शब्दशः लेखन करीत नव्हतो, तर थेट ऑपरेटींग करीत होतो. त्यामुळे ऑपरेटींगमधील बदल कट, पेस्ट, सेव्ह आणि डिलीट प्रकारात मागे – पुढे करता येत असे. त्यामुळे हवा तेवढा मजकूर वारंवार वाढविणे मला शक्य होत गेले. संदर्भ लेखाच्या पद्धती गाईडकडून समजून घेतल्या. त्यामुळे माझे कार्य कुठेही न अडखळता वेगात पुढे सरकत होते.
संशोधन कार्याचा प्रारंभ ठरलेल्या आराखड्यानुसार पहिल्या प्रकरणाची माहिती संकलित करण्यापासून सुरु झाला. गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांनी संशोधन प्रबंधासाठी पहिले प्रकरण ‘प्रस्तावना’ निश्चित केले होते. संशोधनाचा विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ याच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण नऊ मुद्यांची क्रमशः माहिती संकलित करायची होती. कोणतेही संशोधन कार्य त्या विषयाची निवड का व कशासाठी केली ? या दोन प्रश्नांपासून सुरु होते. त्याचाशी संबंधित स्पष्टीकरण प्रस्तावनेत असते. माझ्या संशोधनाचा विषय हा प्रामुख्याने केळी लागवडीतील नवतंत्र वापरामुळे शेतकऱ्यांचे वाढलेले केळी उत्पादन व उत्पन्न, नवतंत्राची माहिती मिळविण्यासाठी केळी उत्पादकांकडून होणारा बहुमाध्यमांचा वापर आणि उत्पन्न वाढल्यानंतर केळी उत्पादकांच्या जीवनमान – राहणीमान यात झालेला सकारात्मक बदल अशा तीन विषयांशी होता.

खरे तर या तीनही विषयांवर स्वतंत्र संशोधन कार्य करता आले असते. पण जनसंवाद व पत्रकारिता हा माझा मूळ विभाग असल्यामुळे माध्यम संशोधनाच्या सोबत, कृषी विभागातील शेतीचे नवतंत्र संशोधन – त्याचा उपयुक्त वापर आणि सामाजिक कार्य विभागाचे जीवनमानातील बदल संशोधन अशा ती विषयांच्या माहितीचे एकत्रित व परस्पर संबंधांचे संकलन मला करायचे होते. त्यामुळे या संकल्पना मूलतः समजून घेणे आवश्यक होते. यात प्रामुख्याने गुणात्मक, संख्यात्मक माहिती संकलनाचे आव्हान होते.
संशोधन कार्य सुरु करीत असताना मी एक निर्धार प्रारंभापासून केलेला होता तो म्हणजे, कोणतीही शारीरिक दुर्बलता ही कामातील अडथळा होऊ द्यायची नाही आणि रोजच्या २४ तासांत जेव्हा शक्य तेव्हा संशोधनाशी संबंधित काम करीत राहायचे. प्रारंभी कोरोना महामारीच्या वर्ष – दीडवर्षाच्या काळानंतर गेल्या चार वर्षांत दोनवेळा गिरलो – पडलो. हाताला – कमरेला मार लागला. दोन्ही वेळा महिनाभर पलंगावर पडून होतो. परंतु मोबाईलवर उपलब्ध विविध अॅपच्या माध्यमातून संशोधन कार्याशी संबंधित पूरक कार्य सुरु होते. मोबाईल अॅप आणि संगणक प्रणालीतील अॅप यांच्यातील कार्यपद्धतीचा संकर (काॅन्व्हर्जन्स)साधण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. त्यामुळे मोबाईलमधील आशय संगणकावर आणि संगणकातील आशय मोबाईलवर मी घेऊ शकत होतो. मी शक्यतो दिवसा झोपत नाही. पण दोन – अडिच तास मला टीव्ही वरील मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा मोबाईलवर करमणुकीशी संबंधित रिल्स वा साऊथकडील हिंदीत डब चित्रपट पाहण्याची सवय आहे. अशा प्रकारे विरंगुळा मिळाला तर मी सतत कार्यरत राहू शकतो.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !
याशिवाय रात्री जेव्हाही मला जाग येते तेव्हा माझ्यावर असलेल्या कामाची जबाबदारी पुढे नेत असतो. मी जर रात्री एक वाजता जागा झालो तर पहाटे पाचपर्यंत काम करू शकतो. गरज वाटली तर पुन्हा तासभर झोपतो. माझ्या याच कार्यशैलीने माझे संशोधन कार्य ठरलेल्या टप्प्यानुसार पुढे नेण्यास प्रवृत्त केले. येथे एक बाब स्पष्ट करायला हवी, संशोधन कार्याचा प्रबंध ८९० पानांचा तयार झाला आहे. यातील एक ओळ सुद्धा मी कधी हातात पेन धरून कागदावर लिहिलेली नाही. सर्व कार्य थेट संगणक – टॅब वा मोबाईलवर ऑपरेटींग पद्धतीने केले. थोडेफार लेखन कार्य विद्यापिठातील संशोधन कार्यालयात सादर करावयाची पत्रे, अहवाल यासाठी करावे लागले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता
संशोधन कार्याच्या प्रारंभी भारतातील कृषी विस्तार (प्राचीन काळ – इंग्रजांचा काळ – स्वातंत्र्यानंतरचा काळ – आताचा आधुनिक तंत्राचा काळ) आणि भारतातील माध्यम विस्तार (पारंपारिक माध्यमे – नव माध्यमे – सोशल मीडिया आणि इंटरनेट आधारित गतिशील माध्यमे) हे विषय मला समजून घ्यावे लागले. या कार्यासाठी ग्रंथालयातून पुस्तके आणणे, काही पुस्तके दुकानातून खरेदी करणे, काही ऑनलाईन मागविणे सुरु झाले. याशिवाय इंटरनेटवर सुद्धा भरपूर शोध कार्य करावे लागत होते. पहिल्या प्रकरणात संशोधनाच्या विषयाचे स्पष्टीकरण देत असताना हाच विषय का निश्चित केला ? हे सुद्धा स्पष्ट करायचे होते.
मी कृषी – केळी आणि माध्यमांशी संबंधित विषय का घेतला ? याचे स्पष्टीकरण काही प्रमाणात पहिल्या भागात आले आहे. त्यासोबत अजून एक महत्त्वाचे कारण होते ते म्हणजे, गेल्या ३० वर्षांमध्ये पत्रकार म्हणून जिल्ह्यात फिरत असताना परिचयातील अनेक शेतकऱ्यांच्या राहणीमानात बदल झाल्याचे मी जवळून पाहिले आहे. अनेक शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावून ते शेतकरी सधन वा उच्च – अती उच्च उत्पन्न गटात पुढे सरकल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात मान – सन्मान – पदे – प्रतिष्ठा मिळाल्याचे मी पाहतो आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांची स्थिती त्यांच्या दोन पिढ्यांमध्ये नक्कीच बदलली आहे हे माझे व्यक्तीगत निरीक्षण होते. खरे तर शेतकरी म्हणून हे मी माझ्या आजोबांच्या कार्य काळातही जवळून अनुभवले होतेच.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !
भारतात जनगणना होते. मात्र आर्थिकस्तर गणना अपवादाचे वर्ष सोडले तर नियमित होत नाही. शेतकऱ्यांच्या आर्थिक पाहणीचे अहवाल फारसे नाहीत. त्यामुळे शेतकरी, सामाजिक वा काही आर्थिक विषयांशी संबंधित संदर्भ वगळता माझ्या हाती फारसे काही लागत नव्हते. महाराष्ट्रात शेतकरी, त्यात केळी उत्पादक शेतकरी यांच्या आर्थिक पाहणीचे फारसे कार्य झालेले नाही. मात्र तमीळनाडू, पंजाब, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यात शेतकऱ्यांच्या उत्पादन – उत्पन्न वाढ संदर्भात काही संदर्भ उपलब्ध होते. तेथील वृत्तपत्रे, आकाशवाणी, टीव्ही माध्यमांनी या विषयावर काही अहवाल तयार केले होते. शेतकरी वर्ग कृषी विषयक माहिती मिळविण्यासाठी कोणती माध्यमे वापरतात ? या संदर्भातही इतर संशोधकांचे काही अहवाल हाती आले. उपलब्ध साहित्याचा आढावा घेत असताना जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर व त्यांचा माध्यम वापर याविषयी संशोधन करायचे हे मी व गाईड प्रा. डाॅ. भटकर यांनी निश्चित करून टाकले.
नंतरचा टप्पा होता, आम्ही निश्चित केलेल्या संशोधन कार्यातील वैशिष्ट्ये, संशोधन कशासाठी करायचे त्याची उद्दिष्टे निश्चित करणे. याबरोबरच विषयाचे समाजिक महत्त्व काय असू शकते ? याचेही स्पष्टीकरण तयार करावे लागले. संशोधनाचे कार्य ज्या जळगाव जिल्ह्यात करायचे, त्या जिल्ह्याची ओळख, परिचय, शेती, माध्यमे हा विषय सुद्धा हाताळावा लागला. संशोधन कार्य म्हणजे किती प्रचंड काम असते याचा अनुभव पावलोपावली येत गेला. माहिती संकलनाच्या सोबत संदर्भ सारणी तयार करणे हे कामही फार किचकट असते हे लक्षात यायला लागले. प्रारंभी बऱ्याचवेळा संगणकावरील ऑपरेटींगचे काम हेलपाटे टाकले, विनाकारण हमाली केली अशा प्रकारात झाले. मात्र गाईडच्या मार्गदर्शनातून कर्यातील नेमकेपणा साधणे नंतर शक्य होऊ लागले. कार्य पुढे सरकू लागले.
(पुढील भाग – संशोधन पद्धती निश्चित करणे …)



