अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागून घरातील वस्तू जळून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल ता.२२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. लागलीच येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला असता आग विझवण्यात यश मिळाले आहे.
राजाराम नगर मधील प्लॉट 23 मधील रहिवासी जितेंद्र जगन्नाथ धनगर हे त्यांच्याच गल्लीतील महादेव मंदिरावर आरतीसाठी गेले होते. त्यावेळी ते आठ वर्षाची अंध मुलगी आरोही हिला घरी ठेवून गेले होते. आरती संपल्यावर गल्लीतील पंकज कैलास पाटील यांनी येऊन सांगितले की तुमच्या घराला आग लागली आहे. धावत पळत घरी गेल्यावर जितेंद्र धनगर यांनी आधी आपल्या अंध मुलीला घराबाहेर काढले. घरातील फ्रीज च्या वरच्या इलेक्टरीक बोर्डात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती.
फ्रीज मधील गॅस टाकीचा स्फोट झाला होता. तातडीने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळविल्यावर त्यांनी अग्निशमन दल प्रमुख दिनेश बिऱ्हाडे यांना अग्निशमन बंब पाठवण्याचे आदेश दिले. अग्निशमन दलातील कर्मचारी फारुख शेख , उस्मान , योगेश कंखरे यांनी आग विझवली. घरातील फ्रीज ,लाकडी देव्हारा , कपाटातील १५ हजार रुपये रोख , फ्रिजवर ठेवलेली १३ ग्राम वजनाची सोन्याची माळ , भांडी कुंडी , संसारोपयोगी साहित्य असा सुमारे दीड लाखाचे साहित्य जळून खाक झाले. घरगुती भांड्यामधील खाद्य पदार्थ जळून खाक झाले होते. जितेंद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.