श्रीकाकुलम (आंध्र प्रदेश) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीबुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित्त झालेली भाविकांची मोठी गर्दी चेंगराचेंगरीत परिवर्तित झाली. या दुर्दैवी घटनेत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या मंदिर परिसरात मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी तैनात आहेत.

शनिवारी कार्तिक महिन्याच्या एकादशीनिमित्त मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जमले होते. सकाळच्या सुमारास मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला. धक्का-बुक्की सुरू होताच अनेक भक्तांचा तोल गेला आणि काही क्षणांतच चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. प्राथमिक माहितीनुसार, गर्दीच्या दडपणामुळे मंदिरातील रेलिंग कोसळले, ज्यामुळे भक्तांचा तोल जाऊन ते एकमेकांवर कोसळले. या घटनेत मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गंभीर जखमींवर विशेष उपचार सुरू आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस दलाची तात्काळ नेमणूक करण्यात आली आहे.
राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मंदिर व्यवस्थापनासोबत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच मंत्री नारा लोकेश यांनीही घटनेबद्दल गहिवरून शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मी स्थानिक आमदार आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून आवश्यक ती सर्व मदत पोहोचवली जाईल.”
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, “श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा वेंकटेश्वर मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचे प्राण गेले ही अत्यंत वेदनादायक घटना आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. अधिकाऱ्यांना तात्काळ बचावकार्य सुरू ठेवून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत याचे निर्देश दिले आहेत.”
या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, धार्मिक स्थळांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेसाठी भविष्यात अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



