Home क्राईम हरताळा फाट्यावर कारचा भीषण अपघात ; पाच जण जखमी, गाडीत दोन नंबर...

हरताळा फाट्यावर कारचा भीषण अपघात ; पाच जण जखमी, गाडीत दोन नंबर प्लेट व पोलिसांचा ड्रेस सापडल्याने खळबळ


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्यावर गुरुवारी सकाळी अर्टिगा कारचा भीषण अपघात घडून पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. वेगात येणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना तातडीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अर्टिगा कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांवर जाऊन धडकली. या धडकेत प्रल्हाद काळू पाटील, सलीम शेख, काशीनाथ साळुंखे, मुरली कोळी आणि ज्ञानेश्वर कोळी हे जखमी झाले. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच हरताळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. डॉक्टरांच्या प्राथमिक तपासणीनुसार दोन जणांना गंभीर दुखापत झाली असून उर्वरित तीन जणांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या अपघातानंतर कारमधील चालक आणि त्याच्यासोबत असलेले सर्वजण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त गाडीवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचे आढळून आल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि पोलीस वर्दी सुद्धा सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप वानखेडे आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक ढाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून अपघाताची नोंद घेतली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

या अपघातामुळे हरताळा फाटा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गाडीवरील दोन नंबर प्लेट आणि पोलिसांचा ड्रेस आढळून आल्याने या प्रकरणामागील नेमके कारण काय याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचे नेमके सत्य समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound