सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाघोदा बु. ते सावदा मार्गावरील सीटी पॅलेस हॉटेलजवळ रविवारी (दि. 22 फेब्रुवारी 2026) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात पायी जाणाऱ्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भरधाव मोटारसायकलने दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोदा बु. ता. रावेर येथील रहिवासी उदय प्रभाकर पाटील हे सायंकाळी सुमारे 6.15 वाजेच्या सुमारास वाघोदा येथून सावदा रोडने पायी जात होते. दरम्यान अंदाजे 7.00 वाजेच्या सुमारास त्यांच्या मागून भरधाव वेगात येणाऱ्या मोटारसायकल (क्रमांक MH 19 AB 8410, बजाज कंपनी, लाल रंग) चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून उदय पाटील यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ते रस्त्यावर कोसळले.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना सावदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीतून समोर आले आहे.
या प्रकरणी मृताचे पुतणे हर्षल प्रभाकर महाजन (वय 37, रा. वाघोदा बु.) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, मोटारसायकल चालक संजय बावस्कर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. रोझोदा ता. रावेर) याने निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित चालकही या अपघातात जखमी झाला असून तो सावदा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
सावदा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वाघोदा व परिसरात शोककळा पसरली आहे. संबंधित मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने वाहतूक नियंत्रण कडक करण्याची, वेगमर्यादा फलक लावण्याची आणि पोलिसांकडून नियमित गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



