मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा बांधकामस्थळी भीषण अपघात घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील चेंबूर परिसरातील सुभाष नगर येथे निर्माणाधीन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून सहा कामगार 80 ते 90 फूट उंचीवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष नगर भागात एका आलिशान इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. शनिवारी दुपारी सुमारे 12.05 वाजता कामगार सहाव्या मजल्यावर नियमित बांधकाम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि सहा जण खाली कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. इतर कामगार आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सर्व कामगारांना तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी 55 वर्षीय रामाल्लू यांना मृत घोषित केले. उर्वरित पाच जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी 22 वर्षीय गुनाधर राय यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उसराई (30), रमेश राय (25), विजय (35) आणि संदीप (27) हे अन्य जखमी कामगार उपचार घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. एवढ्या उंचीवर काम करत असतानाही कामगारांनी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आणि सुरक्षा जाळीचा वापर केला नव्हता. नियमानुसार अशा प्रकारच्या बांधकामांमध्ये सुरक्षासाहित्य अनिवार्य असताना ते न वापरल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा आहे. कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले असते तर कदाचित हा अपघात टळला असता, असे मत व्यक्त होत आहे.
या घटनेमुळे मुंबईतील बांधकाम प्रकल्पांमधील कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, आज सकाळीच वरळी-शिवडी उन्नत मार्गाच्या कामादरम्यान लोखंडी रॉड कोसळून आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही दुर्घटना केईएम रुग्णालय परिसरात घडली असून जखमीवर उपचार सुरू आहेत. एका महिन्यातील अशा सलग घटनांमुळे बांधकामस्थळी सुरक्षेची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे केली जाते, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



