जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यीनी जयश्री महाजन यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विद्यालयातर्फे गौरविण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी विद्यार्थीदशेत असतांनाच्या आठवणीना उजाळा दिला. “मी जे आज काही आहे ते मी माझ्या गुरुजनांची शिकवण व संस्कार यामुळेच या पदावर पोहोचले व यापुढेही भविष्यात गुरूजनांचे आशिर्वादाने व मार्गदर्शनाने कार्य करेल तसेच आज माझा जो सन्मान करण्यात आला हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असून मी विद्यालय व गुरूजनांच्या कायम ऋणात राहील” अशा भावना व्यक्त केल्या.
‘घे भरारी’ या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला सायकलिस्ट व फ्रान्स येथील अँडोक्स या संस्थेच्या वतीने दिला जाणारा सुपर रँडोनिअर्स बहुमान मिळवलेल्या कामिनी धांडे यांच्या धाडसी कार्याचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी कामिनी धांडे यांनी वयाच्या ४४ व्या वर्षी सायकलिंगला सुरुवात केली. व ४७५ दिवसात २१००० किलोमीटर अंतराचा टप्पा कसा पार केला. सलग ३६५ दिवस सायकलिंग करून वडिलांच्या निधनानंतरचा संकल्प कसा पूर्ण केला. हा साहसी व चित्तथरारक प्रवास त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटी,वेळेचे नियोजन,शारीरिक व मानसिक सामर्थ्य याचे महत्त्व पटवून दिले.
तरुण महिला पत्रकार धनश्री बागुल यांचा कोरोना काळातील कामगिरीबद्दल विदयालयातर्फे गौरव करण्यात आला. मूळजी जेठा महाविद्यालयात पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुवर्ण पदक मिळवून पूर्ण करून तरुण भारत, दैनिक सकाळ व दैनिक दिव्य मराठी या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कार्य करीत असलेल्या धनश्री बागुल यांनी कोरोना काळात केलेल्या कार्यात आलेले अनुभव मांडले. विद्यार्थ्यांना आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात आपण कार्य करावे. तसेच कायमच महिलांचा सन्मान करावा असे आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यीनी मोक्षदा चौधरी हिने प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर संचालनात सहभागी झाल्याबद्दल कौतुक करण्यात आले. मूळजी जेठा महाविद्यालयाची एन.सी.सी कँडेट मोक्षदा चौधरी हिने शालेय जिवनात एन.सी.सी च्या कमांडर रोहिणी पाटील यांच्या कडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विविध प्रकारच्या पात्रता परिक्षांमध्ये यश मिळवले व पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर दिल्ली राजपथावर संचलन करू शकले व भविष्यात सुध्दा देशाची सेवा करण्यासाठी चेन्नई येथील आँफिसर प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवण्याची ईच्छा व्यक्त केली. व विद्यार्थ्यांनी अपयश आले तरी खचून न जाता कायम प्रयत्न करावे व आशावादी रहावे. असे विचार व्यक्त केले.
सदरील उपक्रमात मान्यवरांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे व पर्यवेक्षक नरेंद्र पालवे,ज्येष्ठ शिक्षिका माधुरी भंगाळे, पुनम कोल्हे , डी.ए.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा राणे यांनी केले तर सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलाशिक्षक सतिष भोळे,आर.एन.तडवी,पराग राणे, ए.एन.पाटील, इ.पी.पाचपांडे, व्ही.एस.गडदे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.