अहमदनगर (वृत्तसेवा) पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा प्रकार अहमदनगर येथे समोर आला आहे. आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध असतानाही विवाह करणाऱ्या मुलीला आणि जावायला जाळण्याचा प्रयत्न मुलीच्या काका आणि मामांनी केला आहे. गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत. मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे आहे. तर गंभीर भाजलेल्या मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. रागावलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर रूक्मिणी माहेरी आली होती. काही दिवसांनंतर मंगेशलाही भेटायला घरी बोलवलं. त्यानंतर मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी त्याला बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार बघल्यानंतर रुक्मिणीने पुन्हा रागात त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही निघाले असात, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि पेटवून दिलं. गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर पुण्यात उपचार सुरु आहेत.