अमळनेर –लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. अमळनेर ते धुळे या एसटी बसमध्ये प्रवास करताना विसरलेली रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग एसटी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सुरक्षितपणे प्रवाशापर्यंत पोहोचवण्यात आली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या जबाबदार सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:४५ वाजण्याच्या सुमारास अमळनेर ते धुळे या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसमध्ये शिवम् मानकर (रा. धुळे, मूळचे अमरावती) हे प्रवास करत होते. धुळे येथे उतरतानाच्या घाईगडबडीत त्यांनी आपली बॅग बसमध्येच विसरली. त्या बॅगेमध्ये सुमारे २५०० रुपये रोख रक्कम तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे होती. बसमधून उतरल्यावर काही वेळाने ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि ते तातडीने धुळे बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशीसाठी गेले.

मात्र तोपर्यंत संबंधित बस धुळे येथून पुढे जळगावकडे रवाना झाली होती. या वेळी धुळे आगाराचे चालक महेंद्र सनेर यांनी प्रवाशाची विचारपूस करून परिस्थिती समजून घेतली आणि तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी अमळनेर आगारातील वाहक नितिन बागले यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
नितिन बागले यांनी लगेच त्या बसचे वाहक बापू चौधरी यांच्याशी संपर्क साधला. प्रवाशाने दिलेल्या वर्णनानुसार बसमध्ये शोध घेतल्यानंतर ती बॅग बसमध्येच सापडली. बापू चौधरी यांनी बॅगेतील रोख रक्कम आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवत ती स्वतःच्या ताब्यात घेतली.
दरम्यान, प्रवासी शिवम् मानकर यांनी ही माहिती आपल्या धुळे येथील मित्राला फोनद्वारे कळवली. त्यानुसार त्या मित्राने पारोळा बस स्थानकात जाऊन एसटी कर्मचाऱ्यांकडून सदर बॅग ताब्यात घेतली. बॅगेतील रोख रक्कम आणि सर्व कागदपत्रे जसच्या तशी सुरक्षित असल्याचे पाहून प्रवासी व त्याच्या कुटुंबीयांनी एसटी कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
या संपूर्ण घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव आणि प्रवाशांप्रती असलेली सेवाभावाची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. चालक महेंद्र सनेर, वाहक नितिन बागले आणि बापू चौधरी यांनी दाखवलेली तत्परता व प्रामाणिक सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



