Home Cities जळगाव नारळ पाणी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा; २५ हजार रोख आणि आयफोन असलेली पर्स परत...

नारळ पाणी विक्रेत्याचा प्रामाणिकपणा; २५ हजार रोख आणि आयफोन असलेली पर्स परत !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजच्या महागाईच्या काळात रस्त्यावर सापडलेले हजार-पाचशे रुपयेही लोक परत करण्यास कचरतात. अशा परिस्थितीत जळगाव शहरातील एका नारळ पाणी विक्रेत्याने रस्त्यावर सापडलेली २५ हजार रुपये रोख आणि महागडा आयफोन असलेली पर्स प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केली आणि ती संबंधित महिलेला परत मिळाली. या प्रामाणिक कृतीमुळे समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दर्शन घडले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याहस्ते ही पर्स संबंधित महिलेला सुपूर्द करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळील महेश चौकात दीपक राजपूत हे गेल्या ७ वर्षांपासून नारळ पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान ते नेहमीप्रमाणे ग्राहकांना नारळ देत असताना त्यांना दिसले की, एक महिला आपल्या दुचाकीवरून जाताना तिची पर्स रस्त्यावर पडली. दीपक राजपूत यांनी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र ती महिला पुढे निघून गेली.

त्यानंतर एका व्यक्तीने ती पर्स उचलण्याचा प्रयत्न करत असताना दीपक यांनी ती पर्स त्याच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यांनी तातडीने चौकात गस्तीवर असलेल्या जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याकडे ती पर्स जमा केली. निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी पर्सची पाहणी केली असता, त्यात सुमारे २५ हजार रुपये रोख, एक आयफोन आणि काही महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. ठाकूर यांनी आयफोनमधील एका नंबरवरून संपर्क साधला. संबंधित महिलेच्या सासूबाईंनी फोन उचलून लॉक नसल्यामुळे आयफोनचा नंबर देता येत नसल्याचे सांगितले.

काही वेळाने महिला वर्षा पाटील ह्या स्वतः शोध घेत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांच्या हातात आपली पर्स पाहून त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी पोलिसांचे आभार मानले. मात्र, पोलिसांनी ही पर्स आपल्याला नारळ विक्रेते दीपक राजपूत यांनी आणून दिल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संबंधित महिलेने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल दीपक राजपूत यांचे विशेष आभार मानले आणि त्यांना प्रामाणिक भेट म्हणून एक हजार रुपये दिले. दीपक राजपूत यांच्या या कृतीने जगात अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांनी यावेळी जळगावकरांना आवाहन केले की, आपल्याला कधीही मौल्यवान वस्तू सापडल्यास त्या प्रामाणिकपणे परत कराव्यात.


Protected Content

Play sound