मुंबई प्रतिनिधी । महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर येथील चैत्यभूमिवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. देश-विदेशातून विराट जनसमुदाय येथे अभिवादन करण्यासाठी येण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मंत्री जयंत पाटील यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचीही उपस्थिती होती.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना दिलेल्या संदेशात ठाकरे यांनी नमूद केले आहे की, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिल येथील नियोजित स्मारक त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरेल. अन्यायग्रस्त, वंचित, आयुष्याची लढाई हरलेल्या माणसाला विषमतेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तसेच जिंकण्याची प्रेरणा या स्मारकातून मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.