मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने निर्देश देऊनही निवडणुका पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेण्याचे जाहीर केले आहे.
सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यांच्या आत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. मात्र याला आता तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील महापालिका, जि.प. आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याच्याच विरोधात आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. कोर्टाच्या निर्देशांचा अवमान करून राज्य सरकारने मनमानी चालविली असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच, सरकारने लागलीच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे.