एचआयव्ही रुग्णांनी नियमित औषधोपचार घ्यावा : जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

f3bffd64 4c36 4994 8ec1 4d76c6b75b60

जळगाव (प्रतिनिधी) एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या रुग्णांवर शासनाच्या एड्स नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रामार्फत मोफत उपचार करण्यात येत असल्यामुळे अशा रुग्णांनी आपली नियमित तपासणी करुन आवश्यक तो औषधोपचारासाठी घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बबीता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, डॉ. किरण पाटील, डॉ. रावलाणी, केंद्राचे समन्वयक डॉ. पहूरकर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, एचआयव्ही संसर्गित रुग्णांवर नियमित उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी या रुग्णांची परिपूर्ण नोंद केंद्राकडे असणे आवश्यक आहे. जे रुग्ण नियमित तपासणीसाठी येणार नाहीत. अथवा औषधोपचार घेणार नाही. त्यांना औषधोपचारासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सेक्स वर्करचीही माहिती केंद्राकडे असणे आवश्यक आहे. त्यांची नियमित तपासणीचे नियोजन एड्स नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने केले पाहिजे. एचआयव्ही बाधित रुग्णांनी नियमित उपचार घेतल्यास हा रोग बरा होतो याची माहिती संबंधितांना देणे आवश्यक आहे. यासाठी ठोस उपाययोजना तसेच प्रभावी प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जेवढे तपासणी केंद्र असतील त्या तपासणी केंद्रावर दरमहा किती व्यक्तींची तपासणी झाली. त्यापैकी किती व्यक्ती बाधित आढळून आल्यात व किती नियमित औषधोपचार घेत आहे. याची सविस्तर माहिती केंद्राकडे असावी. जेणेकरुन जे रुग्ण तपासणीसाठी येणार नाही त्यांना तपासणीसाठी बोलविता येणे शक्य होईल.

जिल्ह्यात एकूण 25 एड्स नियंत्रण व प्रतिबंधक केंद्र आहे. या केंद्रामार्फत गेल्या दहा वर्षात 8 लाख 24 हजार 46 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 13 हजार 74 व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात 1404 नोंदणीकृत सेक्स वर्कर आहे. जिल्ह्यात दरमहा 50 पेक्षा अधिक एचआयव्ही संसर्गित रुग्ण आढळून येतात. अनेक रुग्ण भितीपोटी चुकीचा पत्ता देतात. उपचारास येण्यास घाबरतात. त्यामुळे त्यांचेवर नियमित उपचार करण्यात अडचणी येत असल्याचे डॉ. पहूरकर यांनी बैठकीत सांगितले.

 

एचआयव्ही संसर्गित रुग्णांनी मनात कुठलीही भित्ती न बाळगता नियमित उपचार घ्यावा. नियमित उपचाराने हा रोग बरा होण्यास मदत होते. या आजारावरील औषधोपचार मोफत होत असल्याने एड्स नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रांमार्फत उपचार घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.

Add Comment

Protected Content