
एरंडोल प्रतिनिधी | तालुक्यातील कढोली येथील एका तरुणाला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरुणाला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे. याबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, दगडू देवराम सुतार ( वय 22 रा. कढोली. एरंडोल) हा गावातील अमोल बडगुजर यांच्याकडे म्हशीचे दूध काढण्याचे काम करतो. आज नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दूध काढत असताना घरासमोर राहणाऱ्या आबा दुधू पाटील याने कामानिमित्त शेतात जाऊ, असे सांगितले. त्यानुसार दगडू सुतार आणि आबा पाटील हे दोघं दुचाकीवर बसून कडोली शिवारातील आबा पाटील यांच्या शेतात गेले. शेतातील घरात आबा पाटीलसह इतर पाच जणांनी दगडूला कुऱ्हाडीच्या दांडक्याने जबर मारहाण केली. मारहाण करण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी झालेल्या तरुणास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.