नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिक बेफिकिर होत असतांना आता याच विषाणूची नवीन आवृत्ती समोर आली असून यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोरोना विषाणूच्या नवनवीन आवृत्ती समोर येत आहेत. यातच इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटमुळं चिंता वाढीस लागली आहे. ओमायक्रॉनचा सब व्हॅरिएंट बीए१ आणि बीए२ यांच्यापासून हा नवा व्हॅरिएंट तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. याला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडून यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नव्हती. पण, आता मात्र तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात धोका व्यक्त केला आहे.
डेल्टाक्रॉनचे नवीन व्हेरिएंट आले आहेत. हा डेल्टा आणि ओमायक्रॉनचा बनलेला एक संकरित व्हेरिएंट आहे. डेल्टाक्रॉनची काही प्रकरणे ब्रिटनमधून नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य तज्ज्ञ आणि लोकांची चिंता वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अहवाल दिला आहे की, या नवीन डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत.
दरम्यान, आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार डेल्टाक्रॉनची अनुवांशिक पार्श्वभूमी डेल्टा व्हेरिएंटसारखीच आहे. तसेच काही उत्परिवर्तन जसे की ओमायक्रॉन. त्यामुळे त्याला ’डेल्टाक्रॉन’ असं नाव पडलं आहे. ओमायक्रॉनचे वर्णन आतापर्यंतचा सर्वात वेगानं पसरणारा कोरोना व्हेरिएंट आहे, तर डेल्टा व्हेरिएंटनं गेल्या वर्षी अनेक देशांमध्ये कहर केला होता.
तज्ज्ञांच्या मते, हा एक सुपर-सुपर-म्युटंट व्हायरस आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहले आहे. यात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि सोशल डिस्टन्स या पंचसुत्रीची अमंलबजावणी पुढेही चालू ठेवण्यासंदर्भात माहिती दिली आहे.