
यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक व सह समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, यावल येथे हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने उद्घाटन समारंभ व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय सोनजे यांनी उपस्थिती दर्शवली. हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. पी. व्ही. पावरा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की, १४ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने महाविद्यालयात हिंदी सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
प्रमुख वक्ते डॉ. विजय सोनजे यांनी “वर्तमान काल में हिंदी भाषा का महत्व” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, हिंदी ही केवळ भाषा नसून ती देशाच्या सांस्कृतिक एकतेचे माध्यम असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी महात्मा गांधींचा हवाला देत सांगितले की, “भाषेविना राष्ट्र मुके आहे.” तसेच, 2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार “एक राष्ट्र, एक भाषा” या संकल्पनेचे महत्व अधोरेखित केले. हिंदी भाषेतील आत्मीयता, सहजता आणि भावनिक अभिव्यक्तीचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडले.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे यांनी हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेमचंद, मुनशी, महादेवी वर्मा यांसारख्या महान साहित्यिकांच्या लेखनाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. त्यांनी हिंदी भाषेतील कादंबऱ्या, निबंध, नाटके आणि काव्यसाहित्य यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित काव्यवाचन स्पर्धेत सात विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये दीपिका राजेंद्र लवंगे (एफ.वाय.बी.ए.) हिने प्रथम क्रमांक पटकावला, नेहा संजय सोनवणे (टी.वाय.बी.ए.) हिला द्वितीय तर भैरवी अजय चौधरी (एफ.वाय.बी.एससी.) हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. हेमंत पाटील व प्रा. नागेश्वर जगताप यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. प्रतिभा रावते यांनी प्रभावीपणे केले. या संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची उपस्थिती होती. हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेप्रती आत्मीयता, अभिमान आणि अभिव्यक्तीची प्रेरणा निर्माण झाली.



