यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात हिंद दी चादर महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, श्री गुरु तेग बहादूर साहेब व श्री गुरु गोबिंदसिंह यांच्या ३५० व्या शहिदी व गुरतागद्दी शताब्दी समागम वर्षानिमित्त यावल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावल नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला यावल शहराच्या प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील, मुख्याधिकारी निशिकांत गवई, सहमुख्याधिकारी रविकांत डांगे, शिक्षण समितीचे सभापती पराग सराफ, नगरसेवक सागर चौधरी यांच्यासह वाल्मीकी समाजाचे प्रतिनिधी जुगल घारू, मोबीन शेख, दिनेश घारू, प्रविण बारसे, मुकेश गजरे आदी उपस्थित होते. यावल नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला सामाजिक ऐक्याचे स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी गुरु तेग बहादूर साहेब यांच्या त्याग, बलिदान व धर्मरक्षणासाठी केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच श्री गुरु गोबिंदसिंह यांच्या शौर्य, नेतृत्वगुण व मानवतेच्या संदेशावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून समाजात सद्भावना, बंधुता व एकतेचा संदेश देत या महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान शासनाच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे विचार समजण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सर्वसफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या योगदानालाही यावेळी सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



