जिल्ह्यात तापमानाने गाठला उच्चांक ; नागरिक हैराण

garmi 1 2846190 835x547 m

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात हॉट सिटी म्हणून परिचित असलेल्या जळगाव जिल्ह्याने नावाप्रमाणेच स्वरुप धारण केले आहे. सुर्यदेवता जणू आगच ओकत आहेत. वेधशाळेने यंदा तापमान अधिक राहील, अशी कल्पना दिलेली असतांनाच पण तापमानाची पातळी एवढी वाढेल, अशी कल्पना ही केली नसेल. तापमानाने आतापर्यंत ४८ डिग्रीचा उच्चांक एप्रिलमध्येच गाठला असून मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानामूळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत, त्याचबरोबर पशू-पक्षी यांचीही होरपळ होत आहे.

 

जिल्ह्यात जिकडे पहावे तिकडे नागरिक उन्हापासून बचाव व्हावा, या हेतूने डोक्याला रुमाल तसेच तोंडाला स्कार्फ बांधून वावरत आहेत. सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होण्यासाठी मोटारसायकल चालक चष्मे, गॉगल लावूनच गाडी चालवताना दिसत आहेत.

खान्देशात एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाची धामधूम असते, परंतु तप्त उन्हामुळे अनेक ठिकाणी दुपारी १.०० वाजेपर्यंतच लग्न समारंभ आटोपण्याचा प्रयत्न मंडळी करतांना दिसत आहेत. दुसरीकडे आधीच कोरड्या पडलेल्या विहिरींमुळे पाणीटंचाई वाढण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. वाढत्या तापमानाचा फटका केळी पिकासही बसला असल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा झळांमुळे केळी कोरडी पडू लागली आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात भाजीपाला दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

नागरिक तहान भागवण्यासाठी आईसक्रीम कोल्ड्रिंक दुकानांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागात कोल्ड्रिंक म्हणून ऊसाचा रसालाही प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे थंड पाण्याच्या बाटल्या, शीतपेय, उसाचा रस यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे महामार्गावर रुमाल, चष्मे यांची दुकाने सहज आढळून येत आहेत.

 

 

Add Comment

Protected Content