नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ता संघर्षावरील महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.
राज्यात शिवसेनेत फूट पडून सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारच्या वैधतेला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे पक्षाचे नेते सुभाष देसाई व सुनील प्रभू यांनी आव्हान दिले होते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची त्यांची मागणी आहे. प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला विरोध केला आहे. तर, मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला आव्हान दिले आहे. या विविध मुद्दयांवरील याचिकांवर सुनावणी प्रलंबीत आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या या सर्व याचिकांवर एकत्रीतपणे सुनावणी सुरू आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने पाच सदस्यीय खंडपीठ निर्माण केले आहे. यात न्या. धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी,. न्या.हिमा कोहली आणि न्या. पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. यात दोन्ही गटांना आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तर या खटल्याची घटनापीठाच्या समोरची सुनावणी ही २९ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. अर्थात, सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.