जळगाव, प्रतिनिधी | श्री नरहरी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे संत नरहरी महाराजांची जयंती पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. जयंतीसाठी जमविलेल्या रक्कमेतुन पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जावून वस्तुस्वरूपात मदत करण्यात आली.
आज संत नरहरी यांचा जयंती उत्सव फक्त प्रतिमा पूजनाने करण्यात आला. पूरग्रस्तांना कोणत्या प्रकारे मदत करण्यात यावी यावर मागील बैठकीत निर्णय घेण्यात घेऊन १५ सप्टेंबर रोजी वस्तुस्वरूपात अन्न धान्य वाटप करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानुसार मदतीसाठी जाणाऱ्या समाजबांधवांना मान्यवरांनी रोख रक्कम, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन मार्गस्थ केले.शंकर अहिरराव, योगेश भामरे, विनोद विसपुते, मनोज बागूल, बबलूमामा बाविस्कर, उमेश विसपुते, श्याम भामरे, सचिन दंडगव्हाळ, भावेश दंडगव्हाळ यांची टीम दिनांक १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोल्हापूरसाठी रवाना झाली. दिनांक १४ सप्टेंबर रोजी श्री दत्तक्षेत्र नृसिहवाडी येथे टीम दर्शनासाठी पोहोचली असतांना स्वामींचे दर्शन करत असतांना शिवसमर्थक बाबाराजे गणपतराव देशमुख यांची भेट घडून आली. कपाळावरचा टिळा व पाठीवरच्या बॅग बघून त्यांनी स्वतः आपुलकीने टीमची विचारपूस केली. या चर्चेतून त्यांना कळले की, जळगावातून संत शिरोमणी श्री नरहरी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने साजरा होणारा जयंती उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरी करून उर्वरित रक्कमेतून पूरग्रसतांना मदत करण्यासाठी सदरील टीम कोल्हापुरात जात आहे असे सांगण्यात आले. त्यांनी टीमचे व समाजाचे आभार मानत पुढील प्रयोजन विचारले. टीमच्या सदस्यांनी केलेल्या नियोजनात सुधार करत त्यांनी फक्त आश्वासनच न देता त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची टीमशी भेट घालून देत मदत वाटपाच्या वेळी त्या सर्वांना आमच्या सोबत जातीने हजर राहण्याचे आदेश दिले व टीम सोबत मनसोक्त गप्पा मारल्या व निरोप घेतांना कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टीम कोल्हापूरला पोचून त्यांनी मदत वाटप करावयाच्या ठिकाणचा दौरा केला व पूरग्रस्त १२० गरजू कुटुंबांना टोकन वाटप केली.आज दि. १५ सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे सकाळी ठिक ९.०० वा. “कुंभार वाडा शाहूपुरी कोल्हापूर” येथे टीम व राजेंचे पदाधिकारी तसेच त्या प्रभागाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत सर्व १२० कुटुंबांना वस्तू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.