जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता शहरातून हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या रॅलीची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून करण्यात आली, आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाला प्रारंभ झाला.
हेल्मेट वापराचे महत्त्व अधोरेखित :
वाहनचालकांनी हेल्मेट वापरणे आणि वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. मोहिमेतून रस्त्यावरील सुरक्षितता नियमांचे पालन, ओव्हरस्पीडिंग टाळणे, ट्रॅफिक सिग्नलचे पालन, आणि मद्यपान करून वाहन चालवण्याचे दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
आरटीओ अधिकाऱ्यांचे मत :
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले की, “सुरक्षित वाहतूक ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायद्याचे पालन नाही, तर जीवन वाचवण्यासाठी महत्त्वाचा आहे. या मोहिमेद्वारे आम्ही नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.”