चेन्नई वृत्तसंस्था | तामिळनाडूत लष्कराचे हेलीकॉप्टर कोसळले असून यात लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतराईच्या परिसरात आज दुपारी लष्कराचे विमान कोसळले. यात काही वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून खराब वातावरणामुळे हे हेलीकॉप्टर कोसळले असून याचा स्फोट देखील झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सुलूर ते कोयंबतूरच्या दरम्यान कुन्नूरच्या जवळ झालेल्या संबंधीत अपघातात जखमी झालेल्या दोन अधिकार्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे या हेलीकॉप्टरमध्ये लष्कर प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे देखील स्वार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर कोसळलेले हेलीकॉप्टर हे एमआय या मालिकेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलीकॉप्टरमध्ये एकूण १४ जण स्वार होते. यातील चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे देखील या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
दरम्यान, या हेलीकॉप्टरमध्ये स्वार असणार्यांची नावे समोर आली आहेत. यात चीफ ऑफ आर्मी स्टॉफ बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत तसेच ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग, गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साई तेजा, सतपाल यांचा समावेश होता.