Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर: शेतीपिकांसह घरांचेही मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर: शेतीपिकांसह घरांचेही मोठे नुकसान


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि विजेच्या जोरदार तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू केली आहे. नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे, जेणेकरून बाधित कुटुंबांना लवकरात लवकर भरपाई मिळू शकेल. ज्या नागरिकांची घरे बाधित झाली आहेत, अशा बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुकानिहाय नुकसानीचा आढावा:
अमळनेर तालुक्यात पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना शाळा व स्थानिक भवनांमध्ये सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. भडगाव तालुक्यात कनाशी व बोरनार येथे कपाशीचे, तर कोठली येथे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यात नागझिरी नाल्याला पूर आल्याने बक्षीपूर येथे एका घराची भिंत कोसळली असून, त्यात सात-आठ शेळ्या दगावल्या आहेत. जळगाव तालुक्यात वडली, जवखेडे आणि बोरनार-लमांजन शिवारात पिकांचे नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यात कल्याणे खुर्द येथे नुकसानीची पाहणी करण्यात आली. पारोळा व एरंडोल तालुक्यांतील विविध शिवारांमध्ये पिकांची हानी झाली आहे. बोदवड तालुक्यात एका घरावर झाड कोसळून नुकसान झाले असून, घरातील व्यक्तींना सौम्य दुखापत झाली आहे. पाचोरा तालुक्यात लासगाव आणि सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून मदत वेळेत आणि पारदर्शकपणे पोहोचविली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.


Protected Content

Play sound