हवामान वृत्त | हवामान खात्याने राज्यात विविध ठिकाणी तीन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे वातावरणात गारठा वाढून काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने पुढील तीन दिवस राज्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त केली असल्यामुळे शेतकरी बांधवांसाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे आहेत.
हवामान खात्याने आज रविवार, दि ९ जानेवारीपासून १३ जानेवारीपर्यंत मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पुढील काही तासांत मेघगर्जनेसह पावसाची तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या बारा जिल्ह्यांत देखील ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.