Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन 

अमळनेर तालुक्यात पावसाचे दमदार पुनरागमन 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून कोरड्या हवामानाने हैराण झालेल्या अमळनेर तालुक्यात अखेर पावसाने दमदार पुनरागमन केलं आहे. तब्बल २० ते २२ दिवसांच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या दीर्घ खंडामुळे अनेक भागांतील शेतातील पिकं कोमेजून जाण्याच्या मार्गावर होती. सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिके वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, पावसाने रात्रीपासून तालुक्यात जोरदार बॅटिंग करत जीवंतपणा परत आणला आहे. या पावसामुळे जमिनीत ओल वाढली असून, पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

पावसामुळे नांद्री-पातोंडा दरम्यानच्या चोपडा मार्गावरील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. नाल्याला आलेल्या पूरामुळे स्थानिक ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत नजारा पाहिला. काही नागरिकांनी याचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले. यामुळे परिसरात एकच चर्चा रंगली होती – “पावसाची पुनरागमन झाली!”

दरम्यान, मारवड ते कळमसरे मुख्य मार्गावर एका झाडाची मोठी फांदी रस्त्यावर आडवी पडल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनी झाड हटवून रस्ता मोकळा केला. या प्रकरणात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पारोळा तालुक्यातही काल रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती आहे. यामुळे कोरडी पडलेली बोरी नदी प्रवाहित झाली आहे. नदीच्या पात्रात पाणी येताच परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांना आगामी काळात लागवडीसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

एकंदरीत, या दमदार पावसामुळे तालुक्यातील हवामानात गारवा निर्माण झाला असून, निसर्गाशी पुन्हा जुळलेली नाळ शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेला हा पाऊस काही अंशी का होईना, पण सर्वांनाच सुखावून गेला आहे.


Protected Content

Play sound