जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यात चांदरस, रेल, लांडी, दोनगाव, टाकळी, फुलपाट, चोरगाव, आणि कवठळ या गावांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतातील संपूर्ण माती वाहून गेली असून, उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी, २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता या भागाला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी पालकमंत्र्यांसोबत धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी आपली दुर्दशा त्यांच्यासमोर मांडली.

पाहणी केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी तात्काळ तहसीलदार आणि त्यांच्या पथकाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. “एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका. सर्व पंचनामे जलदगतीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा,” असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. “या कठीण काळात शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मदतीची आशा निर्माण झाली असून, आता प्रशासनाकडून जलद मदतीची अपेक्षा आहे.



