मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. २४ जुलैअखेर सरासरीपेक्षा ३२ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. जूनअखेर कमी पाऊस झालेल्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. हिंगोली, नंदूरबार आणि अमरावतीत मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
राज्यात एक जून ते २४ जुलै या काळात सरासरी ४५८.४ मिमी पडतो, यंदा ३२ टक्के जास्त, ६०७.२ मिमी पाऊस पडला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात सरासरीपेक्षा ४१ टक्के जास्त, १५८४.१ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई उपनगरात ५२ टक्के जास्त, १८४२.८ मिमी, पालघरमध्ये ३२ टक्के जास्त, १४५७.६ मिमी, रायगडमध्ये ४० टक्के जास्त, २१८०.३ मिमी, रत्नागिरीत ४४ टक्के जास्त, २४७३.९ मिमी, सिंधुदुर्गमध्ये ५२ टक्के जास्त, २५७३.५ मिमी आणि ठाण्यात २२ टक्के जास्त, १४५८.६ मिमी पाऊस पडला आहे. जुलै महिन्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्हेवगळता मध्य महाराष्ट्रात जूनपासूनच पावसाने साथ दिली आहे. २४ जुलैअखेर सरासरीपेक्षा ३२ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. नगरमध्ये ४९ टक्के जास्त, २७५.४ मिमी, धुळ्यात ३२ टक्के जास्त, ३२४.८ मिमी, जळगावात ५२ टक्के जास्त, ३९४.३ मिमी, कोल्हापुरात ३३ टक्के जास्त, ११६७.५ मिमी, नंदूरबारमध्ये सरासरीपेक्षा सहा टक्के कमी, ३३६.७ मिमी पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये ११ टक्के जास्त, ४२१.९ मिमी, पुण्यात ३५ टक्के जास्त, ५६७.२ मिमी, सांगलीत ५९ टक्के जास्त, ३४२.३ मिमी, साताऱ्यात सात टक्के जास्त, ४२७.३ मिमी आणि सोलापुरात ६७ टक्के जास्त, २७९ मिमी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुलनेने कमी पाऊस पडला आहे.
मराठवाड्यात हिंगोलीचा अपवादवगळता यंदाच्या पावसाळ्यात दमदार सरी पडल्या आहेत. बीडमध्ये ४९ टक्के जास्त, ३३४ मिमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच टक्के जास्त, २४०.२ मिमी, धाराशिवमध्ये ८१ टक्के जास्त, ३९६.४ मिमी, जालन्यात २१ टक्के जास्त, ३०३ मिमी, लातूरमध्ये ७२ टक्के जास्त, ४५६.४ मिमी, नांदेडमध्ये १६ टक्के जास्त, ३७७.१ मिमी, परभणीत ३७ टक्के जास्त, ३८३.७ टक्के आणि हिंगोलीत सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी, १४५.५ मिमी पाऊस झाला आहे. हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे.
विदर्भात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. अमरावतीचा अपवादवगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. अकोल्यात १८ टक्के जास्त, ३७४.५ मिमी, अमरावतीत एक टक्का कमी, ३४९.५ मिमी, भंडाऱ्यात २० टक्के जास्त, ५६६.६ मिमी, बुलडाण्यात २६ टक्के जास्त, ३५९.५ मिमी, चंद्रपुरात ३५ टक्के जास्त, ६४२.१ मिमी, गडचिरोलीत ३९ टक्के जास्त, ७७३.५ मिमी, गोंदियात दोन टक्के जास्त, ५४२ मिमी, नागपुरात २७ टक्के जास्त, ५३६.८ मिमी, वर्ध्यात ५४ टक्के जास्त, ५८६.३ मिमी, वाशिममध्ये १६ टक्के जास्त, ४२४.७ मिमी जास्त आणि यवतमाळमध्ये ४४ टक्के जास्त, ५४८ मिमी पाऊस झाला आहे.
राज्यात सर्वदूर चांगला पाऊस होत असला, तरीही हिंगोली, नंदूरबार आणि अमरावतीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीत सरासरीच्या ५८ टक्के कमी पाऊस झाला आहे. सरासरी ३४५.६ मिमी पाऊस पडतो, यंदा १४५.५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरीप पेरण्या अडचणीत आल्या आहेत. धाराशिव, लातूर आणि सोलापुरात सरासरीपेक्षा ७० टक्क्यांहून जास्त पाऊस झाला आहे. धाराशिवमध्ये ३९६.४ मिमी, लातूरमध्ये ४५६.४ आणि सोलापुरात २७९ मिमी पाऊस झाला आहे.