पुणे प्रतिनिधी । पुण्यासह परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार उडाला असून पाच जणांचा यात बळी गेला आहे.
पुण्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून काल रात्रभरही अतिवृष्टी सुरूच होती. विशेष करून काल रात्रीपासून पावसाने अजून जोर धरला आहे. यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले असून याचा वाहतुकाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वाहने अडकून पडली असून हिंजवाणी परिसरात तर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून आले.
अतिवृष्टीमुळे आंबील ओढ्याला पुर आला असून कात्रजपर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ओढ्याच्या दोन्ही काठांवर असणार्या अनेक इमारतींमध्ये पुराचे पाणी शिरले असून यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. दरम्यान, अरण्येशवर व टांगेवाले कॉलनी परिसरात पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहे. याबाबत अधिक माहिती मिळाली नसली तरी भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. अजून काही जण वाहून गेल्याची भिती व्यक्त होत आहे. रात्री बारानंतर लष्कराच्या जवानांनी पुरात अडकलेल्यांना मदत करण्यास प्रारंभ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.