हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे दहा दरवाजे १ मीटरने उघडले !

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे हतनुर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धरणाच्या पाण्याची पातळी २१० मीटरवर पोहचली होती. आतापर्यंत हतनुर धरणात एकुण २१८ दशलक्ष घनमीटर इतका साठा असून टक्केवारी नुसार ५६.२९ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे १० दरवाजे मीटर अंतराने उघडविण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून १९ हजार १०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शेती पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गेल्या १५ ते २० दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या पावसाचे जळगाव जिल्ह्यात आगमन झाले आहे. सध्या जिल्हाभरात चांगला पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात भरीव वाढ झाल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे, तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी नदीवर जाऊ नये किंवा जनावरांना नदीकाठालगत सोडू नये, असे आवाहन हतनूर धरणाचे शाखा अभियंत्यांनी कळविले आहे.

Protected Content