
यावल (प्रतिनिधी) शहरासह परिसरात रविवारी दुपारी सुमारे दीड ते दोन तास वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही प्रमाणात कांदा पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यावल परिसरातील सातोद, कोळवद ,नावरे या परिसरात दुपारी तीन ते चारच्या दरम्यान तुफान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेल्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही प्रमाणात कांदा पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काही शेतांच्या बांधावर आणि यावल ते साकळीदरम्यान रस्त्यावर काही वृक्ष ऊनमळुन पडल्याने यावल चोपडा मार्गावर काही काळ वाहतूक बंद पडली होती. तर याच मार्गावर वढोदेगावा जवळच्या असलेल्या पेट्रॉल पंपाचे देखील वाऱ्यात छत उडाले आहे. या व्यतिरिक्त अजून काही नुकसान झाले असल्याचे कळते. या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या वादळी वारा आणि विजांमुळे शहरातील विद्युत पुरवठा नेहमीप्रमाणे तीन ते चार तास बंद होता.