जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट ही पुढील आठवड्यातही कायम राहणार असून यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी पारा 46 अंशांवर जाऊ शकतो अशी माहिती ॲक्युवेदरच्या अलर्टमधून समोर आली आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमान हे 40 अंशांच्या पलीकडे गेल्याचे दिसून आले आहे. यात दोन दिवसांपासून तर कडक उन पडत असल्याने दुपारी बाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. यातच आजपासून पुढील आठ ते दहा दिवसात उष्णतेची प्रचंड लाट येणार असल्याचे दिसून येत आहे. ॲक्युवेदर या ऑनलाईन हवामानविषयक वेबसाईटने या संदर्भात अंदाज वर्तवितांना याबाबतचा इशारा दिला आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात आज म्हणजे बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी तापमान हे 43 अंशाच्या वर जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर गुरूवारी-42, शुक्रवारी-41, शनिवारी-39, रविवारी-41, सोमवारी-40, मंगळवारी-45, बुधवारी-46 अंश सेल्सीयस तापमान राहू शकते असे ॲक्युवेदरने नमूद केले आहे. जळगाव शहराप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये देखील याच्याच जवळपास तापमान राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.