जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे सामाजिक न्याय, समानता आणि मानवतावादी मूल्यांप्रती दृढ निष्ठा व्यक्त करत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करत संविधानिक मूल्यांची उजळणी केली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोटी कोटी श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानावर आधारित विचार मांडत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत समानतेचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संविधानाची उपयुक्तता, त्यातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बाबासाहेबांच्या कार्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली जाऊन सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या योगदानाची उजळणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया मांडत बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रगत भारत घडवण्याची बांधिलकी जाहीर केली.
या दिवशी आयोजित उपक्रमांद्वारे महाविद्यालयाने सामूहिक सहभागाचे दर्शन घडवले. सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांची कास धरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा उपस्थितांना देण्यात आली.



