Home Cities जळगाव अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली; जनसेवा विचारधारा फाउंडेशनतर्फे शोकसभा

अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली; जनसेवा विचारधारा फाउंडेशनतर्फे शोकसभा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल जळगाव शहरात शोककळा पसरली असून जनसेवा विचारधारा फाउंडेशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. विमान अपघातात त्यांच्या झालेल्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि राजकीय क्षेत्राची मोठी व कधीही भरून न येणारी हानी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दि. २८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता चौघुले प्लॉट, हनुमान मंदिर चौक येथे आयोजित श्रद्धांजली सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालालबापू वाणी आणि डॉ. राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वातावरण शोकमग्न झाले होते.

जनसेवा विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश बोरा यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात दादांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, राज्यातील जनता आपल्या समस्या, अडचणी आणि तक्रारी घेऊन थेट दादांकडे जात असे आणि दादा त्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करत असत. पहाटे ५ वाजल्यापासून सुरू होणारा त्यांचा दिवस १६-१७ तासांच्या कठोर परिश्रमांनी भरलेला असे. प्रशासनावर त्यांची असलेली पकड आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख राज्यभर होती, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी शेखर देशमुख यांनीही भावना व्यक्त करत दादांचे जाणे अजूनही पटत नसल्याचे सांगितले. त्यांच्या जाण्याने राज्यातील जनता पोरकी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सभेदरम्यान उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

श्रद्धांजली सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास तिवारी, गणेश सोनार, गौरव मोरे, गजू कोळी, रुपेश चौधरी, मधुकर चौधरी, राजेश सपकाळे, विजय सोनवणे, राजू मिस्तरी, सचिन ठाकूर, पप्पू पाटील, दिलीप सावळे, शारदा बोरा, योगिता चौधरी, रेखा गवळी, उमेश भालेराव, बापू कोळी, महेश भालेराव, सागर सोनार, मानव चौधरी, नथ्थू बोरसे, संदीप पाटील, नाना महाजन, राजेश गवळी, सचिन चौधरी, सतीश चौधरी, कवी प्रकाश पाटील, प्रल्हाद चौधरी, मुरलीधर सपकाळे, संजय वाणी, लक्ष्मण पाटील, रविंद्र पी. चौधरी, महेश गायकवाड, नरेंद्र चौधरी, घनश्याम गवळी, विठ्ठल सावळे, कृष्णा गवळी, राजू कुमावत, रविंद्र मराठे, अमोल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. अजितदादा पवार यांचे जनतेप्रती असलेले समर्पण, कामातील शिस्त आणि विकासाभिमुख नेतृत्व यांची आठवण काढत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कार्याची छाप सामान्य जनतेच्या मनावर कायम राहील, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत श्रद्धांजली सभेचा समारोप करण्यात आला.

 


Protected Content

Play sound