
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या ७५ वर्षीय वडिलांवर लोखंडी विळ्याने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

चांदसर येथील रहिवासी छगन यादव कोळी (वय ७५) असे मृत वृद्ध वडिलांचे नाव आहे. तर, समाधान छगन कोळी (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला होता. याचवेळी दारू पिण्याच्या कारणावरून छगन कोळी आणि समाधान यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन संतप्त झालेल्या समाधानने लोखंडी विळ्याने वडील छगन कोळी यांच्या पोटावर वार केले, यात ते गंभीर जखमी झाले.
तत्काळ त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना ११ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (११ ऑगस्ट) रोजी दुपारी अडीच वाजता समाधान कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करत आहेत.



