Home प्रशासन जिल्हा परिषद पोषणमाह उत्सवात आरोग्यवर्धक रेसिपींचा समावेश

पोषणमाह उत्सवात आरोग्यवर्धक रेसिपींचा समावेश

0
156

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषण अभियानाला अनुसरून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिला “पोषण माह उत्सव” रावेर पंचायत समितीत उत्साहात साजरा करण्यात आला. बालकांच्या आरोग्यवृद्धीसाठी आणि मातांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या विशेष उपक्रमात अंगणवाडी सेविकांनी ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी तसेच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी उपयुक्त अशा पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी तयार करून सादर केल्या. विविध पोषणतत्त्वांनी युक्त अशा रेसिपींचे प्रात्यक्षिक ‘प्रोटो विटा’ या पूरक पोषण आहाराच्या माध्यमातून दाखवण्यात आले. बालकांसाठी संतुलित आहार आणि मातांसाठी आरोग्यवर्धक अन्नपदार्थ यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या पोषणमहोत्सवाच्या आयोजनास आमदार अमोल जावळे आणि सीईओ मीनल करनवाल यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले आणि उपस्थित महिलांशी संवाद साधत पोषणाबाबत सल्ला दिला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आहार विषयक ज्ञानवृद्धी होऊन पोषणमूल्यांकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पोषण रेसिपींचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी एक आगळी-वेगळी कल्पना राबवली जात आहे. याअंतर्गत एक महिन्याच्या कालावधीत ३० पोषणयुक्त रेसिपी व्हिडिओ स्वरूपात तयार करण्यात येणार असून, हे व्हिडिओ अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक मातेसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे घरबसल्या आरोग्यदायी आणि सुलभ रेसिपी बनवणे शक्य होणार आहे.

हा अभिनव उपक्रम रावेर पंचायत समितीच्या माध्यमातून केवळ आरोग्यपुरता मर्यादित न राहता, समाजात पोषणमूल्यांबाबतची जागरूकता वाढवण्याचे काम करतो आहे. बालकांचा सर्वांगीण विकास, मातांचे आरोग्य आणि एक पोषणमय जीवनशैलीचा प्रसार या माध्यमातून घडणार आहे.


Protected Content

Play sound