धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांना जागतिक दर्जाच्या “कर्मवीर चक्र” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आल्याने जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सामाजिक परिवर्तनात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जाणारा हा प्रतिष्ठित सन्मान मिळणे ही जळगावसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात 26 नोव्हेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था iCONGO आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या कर्मवीर चक्र पुरस्काराचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र श्री. लोणारी यांना प्रदान करण्यात आले. त्यांच्या कार्यकिर्दीतील हा सर्वोच्च मानाचा टप्पा मानला जात आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी म्हणून काम करताना विविध आरोग्य योजनांची प्रभावी प्रसिद्धी, जनजागृती आणि माहिती प्रसारासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. विशेषतः कोविड-19 महामारीच्या संकटकाळात त्यांनी केलेल्या साथरोग नियंत्रण, जनजागृती आणि माहिती व्यवस्थापनाच्या कामाची राज्यभर प्रशंसा झाली. पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाने त्यांना राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविले होते.
श्री. लोणारी यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान केला. 23 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या कार्यतत्परतेचा हा ठोस पुरावा म्हणून पाहिले गेले.
याशिवाय, ग्रामविकास विभागाच्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2023-24 अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कार देण्यात आला. कार्यनिष्ठा, जनसेवा आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत त्यांच्या योगदानाचा हा आणखी एक महत्वपूर्ण सन्मान ठरला.
लोकहित, आरोग्य सेवा आणि सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने झटणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये श्री. मिलिंद लोणारी यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने धरणगाव आणि जळगाव जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीपासून राज्य आणि आता जागतिक स्तरावर मिळालेल्या या गौरवामुळे त्यांच्या समर्पित सेवाभावाची ठोस पावती मिळाली आहे. विविध सामाजिक, प्रशासकीय आणि आरोग्य क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



