यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2024 मध्ये ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होऊनही अद्याप सुरू न झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा असलेल्या स्थानिक नागरिकांना मात्र अद्यापही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
किनगाव येथील या ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला होता. उद्घाटनानंतर लगेचच रुग्णालय सुरू होईल आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाचे दरवाजे अजूनही बंदच असून मुख्य कारण म्हणून कर्मचारी टंचाई पुढे येत आहे. लिपिक, सहाय्यक अधीक्षक, औषध निर्माण अधिकारी तसेच इतर आवश्यक पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयाचे नियमित कामकाज सुरू होऊ शकलेले नाही.

या परिस्थितीमुळे किनगावसह आसपासच्या गावांतील नागरिकांना किरकोळ तसेच गंभीर उपचारांसाठी यावल किंवा जळगाव येथे जावे लागत आहे. वेळेअभावी आणि प्रवासाच्या अडचणींमुळे अनेक रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून काही प्रकरणांमध्ये उपचार उशिरा मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत जळगाव जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील वि. सानप यांनी नाशिक मंडळाच्या उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना पत्र पाठवून तात्काळ पदभरती करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयाचे कामकाज लवकर सुरू करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातून तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी उपलब्ध करून देण्याचाही पर्याय त्यांनी सुचवला आहे.
दरम्यान, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती, किनगाव यांनीही या प्रश्नावर पुढाकार घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सह्या मोहीम राबवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून स्थानिक पातळीवर आंदोलनाची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
उद्घाटन होऊनही रुग्णालय सुरू न होणे हा प्रशासनातील विलंब आणि नियोजनातील त्रुटींचा परिणाम असल्याची टीका होत आहे. आता तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक पदभरती करून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.



