Home Cities धरणगाव क्रांतिकारी खाज्याजी नाईक आश्रमशाळेत आरोग्य तपासणी शिबिर !

क्रांतिकारी खाज्याजी नाईक आश्रमशाळेत आरोग्य तपासणी शिबिर !


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्था संचलित अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण तपासणी व जनजागृती शिबिर नुकतेच घेण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील आणि धरणगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव येथील दंतरोग तज्ञ डॉ. मयूर जैन आणि दंतसहाय्यक श्री. प्रवीण पाटील यांनी हे शिबिर यशस्वी केले.

या शिबिरात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना दातांची निगा कशी राखावी, मौखिक आरोग्य जपण्यासाठी आहार-विहार कसा असावा, तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम याची सखोल माहिती देण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून ‘हे व्यसन करणार नाही’ अशी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

डॉ. मयूर जैन यांनी शिबिरात उपस्थित असलेल्या ३०-३५ विद्यार्थ्यांना तपासले. ज्यांना दातांशी संबंधित समस्या होत्या, त्यांना तपासणीनंतर योग्य औषधेही देण्यात आली. डॉ. जैन यांनी भविष्यात दर तीन महिन्यांनी असे शिबिर घेऊन सर्व विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याबद्दल माहिती व तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांना टूथपेस्ट आणि ब्रश भेट देऊन दातांची निगा कशी राखावी, याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. बी. गायकवाड सरांनी केले, तर सूत्रसंचालन सी. एस. वाघ सरांनी केले. संस्थेकडून अमोल जाधव सरांनी डॉ. मयूर जैन यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रतिक जैन, मनोज रायपूरकर, सचिन भावसार, शाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक आ. दगडू आबा सूर्यवंशी, सुवर्णा महाजन, सर्व शिक्षक आणि चेतन माळी, शशिकांत चौधरी, सौरभ वाघरे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता. क्रांतिकारी खाज्याजी नाईक संस्थेचे अध्यक्ष भाईदासजी सोनवणे, सचिव विलास महाजन, सहसचिव समाधान मोरे, कोषाध्यक्ष वाय. पी. पाटील, किशोर चौधरी आणि सर्व संचालक यांनी डॉ. मयूर जैन व त्यांच्या टीमचे आभार मानले.


Protected Content

Play sound