शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायततर्फे माहेश्वरी मंगल कार्यालयात सफाई कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा विजयाताई खलसे,उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी व सर्व नगरसेवक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी प्रास्ताविकात सफाई कर्मचारी हे शहर स्वच्छ ठेवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना सफाई करीत असतांना विविध आजार होण्याची शक्यता असते. त्यांच्या आरोग्याची काळजी करिता नगरपंचायततर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
नगराध्यक्षा विजया खलसे यांनी सफाई कर्मचारी स्वच्छतेचे कामे वर्षभर करीत असून त्यांच्यामुळेच नागरिकांना आरोग्य सुरक्षा प्रदान होते. सफाई कर्मचाऱ्यांची वर्षातून तपासणी होण्याबाबत, तसेच तपासणी करण्यात आलेल्याची नोंदी फाईल करून रुग्णांना पुढील उपचाराकरिता योग्य राहील असे सांगितले. तर उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल यांनी सफाई कर्मचारी हे नगरपंचायतचे महत्वपूर्ण घटक असून पूर्ण शहराची स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असतांना त्यांना व्याधी होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्याकरिता आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित केलेला असून सर्व कर्मचारी यांनी त्यांचा लाभ घेऊन आपले आरोग्य जपावे, असे आवाहन केले.
ममता हॉस्पिटलच्या सौजन्याने आयोजित आरोग्य शिबिरात डॉ.चेतन अग्रवाल, डॉ. पुजा अग्रवाल, डॉ. मयुरी अग्रवाल व त्यांची टीमने आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीर मध्ये सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, मौखिक तपासणी, मधुमेह इ. तपासणी केली व व्यसनावर मार्गदर्शन केले तसेच रोग निदान उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात उपचार करू शकता असे सांगण्यात आले. कार्यक्रमाकरिता अभियंता, सुहेब काजी,मो.कलीम, लोकेश साळी, विठ्ठल पाटील,दिनेश कुमावत व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी उपस्थित होते.