Home आरोग्य मारूळ येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात 

मारूळ येथे ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर उत्साहात 

0
153


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारूळ ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा यांच्या मार्गदर्शनात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात २०० नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, संशयित रुग्णांची त्वरित चाचणी व उपचारासाठी पुढील पाठवणी करण्यात आली. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

या शिबिराचे उद्घाटन नरेश बाबुराव मासोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील, लोकनियुक्त सरपंच असद अहमद जावेद अली, उपसरपंच सलामत रजा अली, ग्रामविकास अधिकारी आर.टी. बाविस्कर, तसेच आरोग्य क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी व वैद्यकीय अधिकारी डॉ. साकिब फारुकी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्याने गावात आरोग्य जनजागृती करत, क्षयरोगावर उपचार व प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना टीबी म्हणजे काय, त्याची लक्षणं, प्रतिबंध आणि उपचार या विषयावर माहिती दिली. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन नागरिकांना तपासणीसाठी प्रेरित केले.

या शिबिरात २०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०० जणांचे थुंकी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, १५ जणांना एक्स-रे तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर ३ जणांची सीबायनॅट टेस्ट व ५ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले. तपासणीस आलेल्या संशयित रुग्णांवर आवश्यकतेनुसार पुढील उपचार सुरू करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमासाठी डॉ. शहनाज तडवी, डॉ. तृप्ती चौधरी, डॉ. अतुल वायकोळे, डॉ. कीर्ती भामरे, किशोर खिस्ते, मन्यार शेख, अभिजीत पगारे, दिनेश चौधरी, स्वप्नील तायडे, दीपक दीक्षित, हरून काजी, परवेज भाई व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक माध्यम प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्यांनीही आयोजनात सक्रीय सहभाग घेतला.

एकूणच, मारूळ गावात घेतलेले हे आरोग्य शिबिर केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता, टीबी मुक्त भारतासाठी लोकजागृती व सक्रिय प्रतिबद्धता दाखवणारा ठरला. ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागामुळे उपक्रमाने अपेक्षित उद्दिष्ट साध्य केले.


Protected Content

Play sound