Home क्राईम भरदिवसा शिक्षिकेचे बंद घराचे कुलूप उघडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

भरदिवसा शिक्षिकेचे बंद घराचे कुलूप उघडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !


जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील ‘शकुंतला हाईट्स’मध्ये एका बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी भरदिवसा सव्वा लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीवारी २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तृषा चंद्रकांत संन्यासी (वय ३९), रा.कोल्हे हिल्स परिसर, जळगाव या दिनांक २८ मार्च रोजी सकाळी १०ते दुपारी १:००वाजेच्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यांनी घराच्या दरवाजाजवळच एका ठिकाणी घराची चावी ठेवली होती. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दाराजवळ लपवून ठेवलेली चावी शोधून काढली आणि त्याच चावीने घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून चोरट्यांनी ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन, ४५ हजाराचे मंगळसुत्र, सोन्याचे तुकडे, सोन्याच्या नाणी आणि २० हजारांची रोकड असा एकुण १ लाख ३३ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला.

तृषा संन्यासी दुपारी घरी परतल्या असता त्यांना घराचे कुलूप उघडे दिसले आणि घरातील ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound