सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथे हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीर बालेशा बाबा रहैमतुल्ला अलैह सरकार यांच्या उर्स सोहळ्याचे आयोजन १६ आणि १७ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्याला राज्यभरातील भाविकांनी हजेरी लावून नवस फेडण्याचा परंपरा जोपासली जात आहे.
संदल मिरवणूक आणि चादर चढवण्याचा कार्यक्रम:
१६ जानेवारी रोजी ढोल-ताशा, बँड पथकाच्या गजरात गावातून भव्य संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत चादर चढवण्याचा सोहळा विशेष आकर्षण ठरणार आहे. हजरत पीर बालेशा बाबा रहैमतुल्ला अलैह यांच्या जागृत दर्ग्यावर सर्वधर्मीय भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावून नवस फेडतात.
यात्रा आणि महाप्रसाद:
१७ जानेवारीला उर्सनिमित्त मोठ्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सलग दोन दिवस महाप्रसादाचे लंगर, न्याज, आणि हलीम यांसारख्या मोफत भोजनाचा कार्यक्रम भक्तगणांच्या वतीने आयोजित केला जातो. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी.
कव्वाली मुकाबला पुढे ढकलला:
उर्स सोहळ्यात रात्रभर कव्वाली मुकाबल्याची जुगलबंदी हा एक खास कार्यक्रम मानला जातो. मात्र, यंदा कव्वालीचा कार्यक्रम पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकात्मतेचे प्रतीक:
हजरत पीर बालेशा बाबा रहैमतुल्ला अलैह यांच्या संदल उर्स शरीफ सोहळ्याला हिंदू-मुस्लिम भाविक मोठ्या श्रद्धेने हजेरी लावतात. उर्स कमिटीने पंचक्रोशीतील नागरिकांना या दोन दिवसांच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षी मोठ्या थाटात संपन्न होणाऱ्या हा उर्स सोहळ्यात हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन दिसून येते