भुसावळ प्रतिनिधी । शहरात नुकत्याच काढण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या परिसरातील फेरीवाल्यांवर आरपीएफ गुन्हे दाखल करत असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फेरीवाल्यांनी आमदार संजय सावकारे यांना साकडे घातले आहे.
याबाबत वृत्त असे की, अलीकडेच रेल्वेच्या हद्दीत असणारे अतिक्रमण काढण्यात आले. दरम्यान, या भागात पूर्वीपासून व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांनाही रेल्वे प्रशासनाचा फटका आता बसत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या परिसरात त्यांना व्यवसाय करण्यासाठी मज्जाव केला जात असून असा प्रयत्न केल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी फेरीवाल्यांनी आमदार संजय सावकारे यांना एक निवेदन दिले आहे. यात या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, आरपीडी रोड हा अद्यापही नगरपालिकेने रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केलेला नसतांनाही आरपीएफ हे स्थानिक विक्रेत्यांना हेतूपुर्वक त्रास देत आहेत. त्यांना येथे अगदी उभे राहण्यापासूनही मज्जाव करण्यात येत असून आरपीएफकडून मारहाण करण्यात येते. यामुळे याबाबत आमदारांनी कार्यवाही करण्याची अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार संजय सावकारे यांनी या प्रकरणी आपण डीआरएम यांच्याशी चर्चा करून या समस्येचे तातडीने निराकरण करण्याची ग्वाही दिली.