जळगाव (प्रतिनिधी) नंदुरबार येथील एका पोलीस हवालदारास आज (दि.२५) नंदुरबार येथील लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातील नारायणपूरमधील पापनेर येथील रहिवाशी असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या अदखलपात्र तक्रारी संदर्भात मदत करण्यासाठी हवालदार बबन बापू पाटील यांनी त्याच्याकडे सहा हजार रुपयांची मागणी केली, त्यानंतर तडजोड करून चार हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार २५ एप्रिल रोजी पंच आणि साक्षीदारांसमोर त्यांनी ही लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक संगीता एस. पाटील यांच्या पथकाने पोलीस उपाधीक्षक शिरीष टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून हवालदारास रंगेहात अटक करण्याची कारवाई केली.