हवाईदलाची शान ‘मिग २७’ लढाऊ विमानाची आज सेवानिवृत्ती

mig 6

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय हवाईदलाची शान म्हणून ओळख असलेले आणि जमिनीवर हल्ला करण्यात कुशल असलेले ‘मिग २७’ हे लढाऊ विमान शुक्रवार, २७ डिसेंबरला निवृत्त होत आहे. कारगिल युद्धात या विमानाने मोलाची कामगिरी बजावली. यामुळे ‘बहाद्दूर’ असे नाव असलेल्या या विमानाची शुक्रवारी कारगिल हिरोंच्या उपस्थितीतच जोधपूर हवाईतळावरुन अखेरची फेरी होणार आहे.

मिग मालिकेतील विमाने मूळ रशियन बनावटीची आहेत. यापैकी मिग २३ व मिग २७, ही विमाने जमिनीवरून शत्रूच्या प्रदेशात खोलवर मारा करण्यात कुशल आहेत. यापैकी मिग २३ याआधीच निवृत्त झाले आहे, तर आता मिग २७ निवृत्त होत आहे.

ताशी १७०० किमी वेगाने उडणारी एकूण १६५ मिग २७ विमाने १९८६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आली. रशियाकडून ही विमाने खरेदी करताना त्यात ‘इन्फ्रारेड’ किरणांद्वारे जमिनीवरील लक्ष्याचा शोध घेणारी विशेष सामग्री बसविण्यात आली. या सामग्रीने सज्ज असलेली १५० विमाने भारतातच तयार करण्यात आली. या सामग्रीचा १९९९ च्या कारगिल युद्धात हिमालयाच्या डोंगररांगांवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला करण्यासाठी चांगला उपयोग झाला. कारगिल युद्धातील कामगिरीबद्दल या विमानांना ‘बहाद्दूर’ असे टोपणनाव देण्यात आले.

२०१० नंतर विमानांच्या बहुतांश तुकड्या टप्प्याटप्प्याने निवृत्त होत गेल्या. यापैकी दोन तुकड्यांची कालमर्यादाही वाढविण्यात आली होती. त्या तुकड्या जोधपूर हवाईतळावर आहेत. त्यातील एक तुकडी मागील वर्षी निवृत्त झाली. तर अखेरची तुकडी आता शुक्रवार, २७ डिसेंबरला निवृत्त होत आहे. हवाईदलाच्या दक्षिण पश्चिम कमांडचे प्रमुख एअरमार्शल एस.के. घोटिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

Protected Content