फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘विवेक पूर्ण जीवन जगण्यासाठी आत्मचिंतन करणे म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणे होय’. असा मौलिक संदेश सतपंथ संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद देताना सांगितले.
‘मी आणि माझे इष्ट एकच आहे हा भाव म्हणजे गुरुभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. संसारिक जीवनात आपण जे काही काम कराल ते मनापासून करा. गुरु गीता ही मा पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा सार आहे. संसारिक जीवनात पती-पत्नीच्या संवादातून वाद न होता गुरुगीते सारखे अमृत निर्माण होणे आवश्यक आहे. गुरु गीता ही गुरु शिष्याचे संबंध, नाते तसेच जीवन कसे जगावे हे शिकवते.
गुरुपौर्णिमेनिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमात काल गुरुपाद पूजन, मंत्र जप, भजन, महाराजांची तुला, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संजीवनी रक्त पेढीच्या सहकार्याने भाविकांनी रक्तदान केले. यावेळी गुजरात सह मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मंदिरात उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या हा कार्यक्रम लाईव्ह असल्याने जगभरातील अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला.