भाजपा प्रवेशाला नकार देताच हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर आयकर विभागाची धाड

hasan mushrif

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) भाजपा प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभातील ऑफर धुडकावून अवघे चार दिवस होत नाही तोच आज (गुरुवारी) सकाळी कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी गुरुवारी सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकल्या. तब्बल पंधरा जणांचे पथक त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेत आहे. मुश्रीफ यांच्या घरासह त्यांचा माद्याळ ता. कागल येथील खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर गर्दी केली आहे.

 

मागच्या चार दिवसांपूर्वी भाजपा प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. पण मुश्रीफ यांनी नकार देऊन शरद पवार हेच आपला दैवत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर कर्नाटकात एकेक आमदाराला खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपये भाजपाने दिले असून, हा पैसा आला कोठून? अशी विचारणा देखील केली होती. त्याचा परिणाम म्हणूनच ही कारवाई झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content