Home Cities पारोळा पिंपळकोठाच्या हर्षल पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड 

पिंपळकोठाच्या हर्षल पाटीलची नवोदय विद्यालयासाठी निवड 


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पिंपळकोठा (ता. पारोळा) येथील विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हर्षल प्रमोद पाटील याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून त्याच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी घेण्यात आलेल्या या स्पर्धात्मक परीक्षेत हर्षलने 193 गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश मिळवले असून त्याच्या यशात शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हर्षलने परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली.

दरवर्षी भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या परीक्षेत हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत CBSE अभ्यासक्रमानुसार मोफत शिक्षण, निवास आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी मानली जाते.

हर्षलच्या या यशाबद्दल पिंपळकोठा व भोलाणे परिसरातील ग्रामस्थांकडून त्याचे आणि त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे. शाळेच्या यशामुळे संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला असून इतर विद्यार्थ्यांनाही यशाची प्रेरणा मिळाली आहे.


Protected Content

Play sound