कोलंबो-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी संसद बरखास्त करण्याच्या विशेष राजपत्र अधिसूचनेवर स्वाक्षरी केली. तसेच त्यांनी चार सदस्यीय मंत्रिमंडळाची स्थापना केली. यासह हरिनी अमरसूर्या यांची श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नेमणूक केली आहे. दिसनायके यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी त्यांना पंतप्रधानपदाची शपथ देण्यात आली.
एनपीपी खासदार विजीता हेराथ व लक्ष्मण निपुणाराच्ची यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, हरिणी अमरसूर्या या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्याआधी सिरिमावो भंडारनायके व त्यांची मुलगी चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा यांनी श्रीलंकेचं पंतप्रधानपद भूषवलं आहे. चंद्रिका कुमारतुंगा यांनी आधी पंतप्रधानपद व नंतर श्रीलंकेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे. श्रीलंकेच्या या नवीन पंतप्रधानांचं भारताशी खास कनेक्शन आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे. मंगळवारी श्रीलंकेच्या १६ व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेणाऱ्या हरिनी यांनी ९० च्या दशकात दिल्लीतील प्रतिष्ठित हिंदू महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. १९९१ ते १९९४ या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठातून समाजशास्त्र विषयातून पदवी मिळवली आहे. त्या या महाविद्यालयाच्या पहिल्या हेड ऑफ स्टेट देखील होत्या.